जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह'चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.06 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जास्तीत जास्त नागरिक विद्यार्थी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार हा सप्ताह साजरा करण्यात येत असून, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत विविध प्रबोधनात्मक व कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येईल . त्याचप्रमाणे पत्रकार परिषदेचे आयोजन करून सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर दि. ९ एप्रिल २०२६ ला जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष आणि संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १० एप्रिल २०२६ ला समता दूतामार्फत पथनाट्य व लघुनाटिकाद्वारे शासकीय योजनांचे प्रबोधन ,तसेच मार्जिन मनी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. दिनांक ११ एप्रिल२०२६ ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १२ एप्रिल २०२६ ला 'संविधान जागर, अंतर्गत भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्यान, तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १३ एप्रिल २०२६ ला ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, रक्तदान शिबिर ,स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालय, महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात येईल व इतर कार्यक्रमात व्याख्याने चर्चासत्रे व सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'