खत साठ्यात तफावत आढळल्यास खत विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- राज्यातील कृषी केंद्र चालक आणि त्यांच्याकडील खतविक्रीनंतरचा शिल्लक साठा आणि पॉस मशीन मधील साठा यांचा दररोज ताळमेळ असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत.या महिनाअखेर राज्यभर कृषी विभागाकडून खतांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास दोषीवर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिले आहेत. खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांच्या पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोहीम स्वरूपात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खत विक्री केंद्रावर साठा फलक व किंमत सूची अद्ययावत असणे, खतांचा साठा व विक्री नोंदवही प्रत्यक्ष साठ्याशी जुळणे, लिंकिंगला नाही म्हणा (say no to Linking ) बोर्ड विक्री केंद्रावर प्रदर्शित करणे, अनधिकृत व विनापरवाना खत विक्रीवर बंदी, जास्त युरिया खरेदी करणाऱ्यांची तपासणी करणे व ई पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व खत विक्रेत्यांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या रासायनिक खतांचा एकूण २२१४ मॅट्रिक टन इतका खत साठा उपलब्ध आहे. त्यापैकी ३१२ मॅट्रिक टन युरियाचा साठा शिल्लक आहे. तसेच युरियाचा ४५० मे.टन व डीएपी चा १५ मे.टन संरक्षित साठा मंजूर आहे. माहे एप्रिल महिन्यापासून केलेल्या कृषी केंद्र तपासणीमध्ये एकूण ९ विक्री केंद्राच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आल्याने कृषी अधिकारी, गुणनियंत्रण, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधितांवर कारवाई प्रस्तावित केली. त्यामुळे अद्ययावत खतसाठा नोंद ठेवण्याची जबाबदारी कृषी केंद्र चालकांची आहे. सर्व खत विक्री केंद्रांनी त्यांच्या पॉस मशीनवरील खतसाठा आणि प्रत्यक्ष गोडावूनमधिल शिल्लक साठा यांचा ताळमेळ वेळच्यावेळी अद्ययावत करावयाचा आहे. जर विक्रेत्यांच्या पॉस मशीनवरील खत साठा प्रत्यक्ष शिल्लक असलेल्या खत साठ्यांशी जुळत नसेल तर अशा विक्रेत्यांविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्य वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिली आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'