अण्णासाहेब पाटील महामंडळाचा उपक्रम; लाभार्थ्यांना ‘लोकल ते ग्लोबल’कडे वाटचाल
सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून “लोकल ते ग्लोबल” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लहान व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक स्नेहल पुजारे व गोविंद परब यांनी केले आहे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरतेच मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम व Marketing Tab सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.
व्यवसाय वर्धन (Marketing Tab): स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ
आजच्या स्पर्धात्मक युगात उत्पादन तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे ही आवश्यक आहे. अनेक लघुउद्योजकाकडे दर्जेदार उत्पादने असली तरी त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन (Business Promotion) Marketing Tab विकसित केला आहे. हा Marketing Tab प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जसे की Flipkart,Amazon आणि India MART यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनाची माहिती, फोटो, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा मिळते. सध्या या प्लॅटफॉर्मवर 27,500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय श्रेणी ,उपश्रेणी ,महसुली विभाग, जिल्हा व तालुका याप्रमाणे सर्च सुविधा देण्यात आले असून, नागरिकांना या सुविधेचा वापर करून नजीकच्या महामंडळाच्या लाभार्थ्यांची माहिती शोधता येईल व लाभार्थ्यांची उत्पादने व सेवा याचा लाभ घेता येऊ शकेल.
व्यवसायवर्धन (Buisness Pramotion) बाबत आवश्यकतेनुसार अधिक सहकार्यासाठी महामंडळाच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क करावा. भविष्यात लाभार्थ्यांच्या मागणीनुसार Payment Gateway बाबत महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
डिजिटल प्रशिक्षण: यशस्वी व्यवसायाची पायाभरणी
कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून, योग्य ज्ञान, कौशल्ये आणि बाजारपेठेची समज असणे अत्यंत आवश्यक्य आहे. अनेक लाभार्थ्यांकडे व्यवसाय करण्याची इच्छा असली तरी त्यांना व्यवस्थापन, तांत्रिक माहिती, मार्केटिंग, ग्राहक हाताळणी, आर्थिक नियोजन आणि डिजिटल साधनांचा वापर याबाबत पुरेशी माहिती नसते. हीच गरज ओळखून महामंडळाने Webinar,You Tube आणि Podcast यांच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत.
व्यवसाय कसा सुरू करावा आणि वाढवावा ,उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग कशी करावी, डिजिटल मार्केटिंग व सोशल मीडियाचा वापर ,ग्राहकांशी संवाद आणि विक्री कौशल्ये,आर्थिक नियोजन व नफा वाढवण्याचे मार्ग अशा विविध प्रशिक्षणाद्वारे लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध व्यवसायाबाबत तज्ञ व्यक्तींकडून तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ अधिकृत You Tube व Facebook चॅनलवर उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
महामंडळाने DigiLocker सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट (integrate) केली आहे. त्यामुळे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ वेगवान व विश्वासार्ह करण्यात आलेली आहे. भविष्यात MAHA-ID व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) Integration बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
००००००००
Comments
Post a Comment