जिल्ह्यात 21 ऑक्टोबरपर्यंत मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता,नागरिकांनी दक्षता घ्यावी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधीत तुरळक ठिकणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची, वीजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा. तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी - 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी - 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी - 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी - 02362-222525, मालवाण तालुक्यासाठी - 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी - 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी - 02367-237239 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'