राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश 140 पदकांची कमाई महाराष्ट्र संघाने मिळवले दुसरे स्थान.

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का): गुजरात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल 140 पदकाची कमाई करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत भगवा झेंडा फडकावला. पदक तालिकेत महाराष्ट्र संघाने दुसरे स्थान मिळवले.या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर गुजरात राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. यापूर्वी केवळ येथे 2015 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती. गुजरात राज्यात अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर अशा सहा ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.36 क्रीडा प्रकारात तब्बल सात हजार खेळाडूंनी आपले कौशल्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खेळाचे यश ठळकपणे झळकले. पदक तालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या सर्व्हिसेस आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरियाणा यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 140 पदकाची कमाई करुन ही स्पर्धा गाजवली. आधुनिक सुविधा,खेळाडूंसाठी असलेले विविध सुविधा आणि ऑलिंम्पिकपटू, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या सर्व्हिसेस आणि हरियाणाच्या खेळाडूंच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या हौशी खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य आणि मिळवलेले घवघवीत यश हे महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भारतात बलवान आहे हे दर्शवतो. पदक तालिकेत महाराष्ट्र संघ दुसऱ्या स्थानातवर दिसत असला तरी महाराष्ट्राने सर्वाधिक 140 पदकाची कमाई करून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 36 क्रीडा प्रकाराचा समावेश होता. यातील जवळपास सर्वच प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकलेली आहेत हे विशेष. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात राज्यात होणार अशी घोषणा होताच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश असलेल्या क्रीडा प्रकारांच्या संघटनांशी संपर्क साधून खेळाडूंच्या तयारीचे नियोजन केले. सराव शिबिराचे नियोजन देखिल अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. सर्वच क्रीडा प्रकारांच्या सराव शिबिरात तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले होते. सराव शिबिराचे नियोजन करण्याबरोबरच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी 4 कोटी 50 लाख रुपयाची तरतूद करुन घेतली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडू विमानाने स्पर्धेच्या ठिकाणी पोहचले आणि पुन्हा विमानाने महाराष्ट्रात दाखल झाले हे विशेष एका स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना विमान प्रवासाचा लाभ होण्याची ही पहिलीच घटना आहे. खेळाडूंना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये. यासाठी विमानाने पाठवण्याची व्यवस्था व्हावी यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. यात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूनी आपल्या अफलातून कामगिरीने गाजवली असली तरी मैदानाबाहेरच्या आवश्यक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, कीडा विभागाचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे व वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी केलेले नियोजन हे देखील तेवढेच निर्णायक ठरले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी व क्रीडा खात्याचे अधिकारी यांनी खेळाडूचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. राज्य शासन, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, राज्याचा क्रीडा विभाग, खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे पदाधिकारी यांची एकत्रित सांघिक कामगिरी उत्कृष्ट ठरल्यानेच महाराष्ट्राने सर्वाधिक पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका वाजवत भगवा झेंडा मोठ्य दिमाखाने फडकवला. टीम महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र ही थीम ही खऱ्या अर्थांने प्रत्यक्षात आली.अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली . 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'