िद्यार्थ्यांसाठी 'समान संधी केंद्रे' स्थापन होणार शिष्यवृत्ती, फ्री शिप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार - सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
व
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – सामाजिक न्याय विभागाद्वारे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये 'समान संधी केंद्राची' स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, प्री शिपसह इतर योजना आणि स्पर्धआ परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी दिली. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व्यासपीठ निर्माण करून याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शासन यामध्ये सुसंवाद साधण्यास मदत होणार असल्याचेही श्री. घाटे यांनी सांगितले.
प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच समान संधी केंद्र सुरू करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांमध्येही शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
सोबतच रोजगार, उद्योजक किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचे सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरुपाची केंद्रे तात्काळ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसली तरी प्रत्येक महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्राची स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्तीकरून व्हॉट्सॲप ग्रूप तयार करण्यात येणार असून, इतर सोशल मीडियाचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या उपक्रमास सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment