शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिम
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) – 19 फेब्रुवारी 2022 रोजी शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या मार्फत पुरातत्व विभागाच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये स्वयंसेवी संस्था, दुर्गप्रेमी स्वयंसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील राजगड, तोरणा, शिवणेरी, रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. या संवर्धनाचा एक भाग म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन्ही किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता मोहिम ही दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वा. सुरू होणार आहे. यामध्ये किल्ल्यावरील अनावश्यक गवत कापणे, झाडे - झुडपे काढणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे याचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, मालवण तहसिलदार अजय पाटणे यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
00000
Comments
Post a Comment