इतर मागास घटकांच्या आर्थिक विकासासाठी शामराव पेजे महामंडळाच्या योजना

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) – शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे इतर मागास घटकांसाठी 20 टक्के बीज भांडवल, 10 लाख रुपये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा व 10 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना - या योजनेत कर्ज मर्यादा रु. 5 लाख असून कर्जाची मुदत 5 वर्ष आहे. योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाते. याकरिता लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेत कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये असून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास 12 टक्के पर्यंतचा व्याज परतावा लाभार्थीच्या बचत खात्यात दरमहा जमा करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थीचे वय 18 ते 50 वर्ष असावे. योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobefde.org या महामंडळाच्या संकेतस्थळावर व्याजपरतावा मध्ये नाव नोंदणी करून सादर करावयाचा आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेची मर्यादा 50 लाख रुपये पर्यंत आहे. गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास 12 टक्क्यापर्यंत व्याज परतावाची रक्कम लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येते. योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobefde.org या महामंडळाच्या संकेतस्थळावर व्याजपरतावा मध्ये नाव नोंदणी करून सादर करावयाचा आहे. थेट कर्ज योजना - या योजनेत कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये असून मुदत 4 वर्ष आहे. महामंडळाकडून ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज न भरल्यास द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची अट रु 1 लाख आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी 500 असणे आवश्यक आहे. या योजनेकरिता लाभार्थ्याचे वय 18 ते 55 वर्ष असावे. ज्या गरजू उमेदवारांना या योजनांचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय किंवा सुरू असलेला व्यवसाय वाढ करायचा आहे, त्यांनी शामराव पेजे कोकोण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, सिंधुदुर्गनगरी येथे दूरध्वनी क्र. - 02362-228119 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'