ग्राहक हक्कांबाबत जनजागृतीसाठी ‘जागतिक ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जिमाका) : ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी तसेच ग्राहक संरक्षण कायद्याविषयी व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष तृप्ती धोडमिसे भूषविणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील पत्रकार भवन सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन ललित गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद विजय सहारे यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांसह नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे हक्क, तक्रार निवारण प्रक्रिया तसेच बाजारातील व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'