‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य करत असून प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे महिलांना सक्षम करण्याची नव्हे तर त्यांना योग्य संधी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने 'क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमा'सह जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार चैताली सावंत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे,प्रमुख वक्ते डॉ. सुभाष दळवी, डॉ. प्रियंका कासार- पाटील, ॲङ प्रणिता कोटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' रॅली व दिंडीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. जिल्हाधिकरी यांच्या हस्ते महिलांसाठी आयोजित वैद्यकीय शिबीराचे देखील उदघाटन करण्यात आले. श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, महिलांनी मिळालेल्या संधींचे सोने करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या विकासातही मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. समाजाच्या सर्व स्तरांतील महिलांना एकत्र येऊन आनंदाने एक दिवस घालवता यावा आणि त्यांचे कार्य गौरवले जावे या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनातील महिला असोत किंवा ग्रामीण भागातील महिला असोत, प्रत्येकाने आपल्या कार्याचा अभिमान बाळगावा आणि अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन एकमेकांना प्रेरणा द्यावी. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांना प्रेरणा, संवाद आणि आनंदाचा मंच मिळाला असून मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असेही त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेमार्फत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी स्वयंसहाय्यता गट, रोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आवश्यक प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी केले. त्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ या केंद्र शासनाच्या योजनेची सविस्तर पार्श्वभूमी उपस्थितांना सांगितली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘सिंधुकन्या’ या अभिनव योजनेची माहितीही त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिला विविध आवश्यक दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत आहेत. यामुळे पालकांची धावपळ कमी होऊन मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती सामंत यांनी केले. यावेळी जिल्हास्तरीय आदिशक्ती ग्राम पुरस्कार वितरण करण्यात आले. आदिशक्ती योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रथम पुरस्कार : देवगड तालुक्यातील किंजवडे ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार : कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायत तृतीय पुरस्कार : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'