राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल
सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जिमाका) :- समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-26 या उपक्रमांतर्गत “Exposure Visit Inside State” या शैक्षणिक सहलीसाठी ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्य आहेत. ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस (Reward) देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील (इ.6 वी ते इ.8 वी) 23 मुली व 22 मुलगे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना दि.23 ते 24 मार्च 2026 या कालावधीमध्ये सहल आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयप्रकाश परब यांनी दिली आहे.
सहल कार्यक्रमानुसार पहिल्या दिवशी सिंधुदुर्गनगरी येथून कणेरी मठ, बाहुबली गार्डन, वारणा समूहाचा दूध उत्पादन प्रकल्प, साखर कारखाना, सुतगिरणी, जयसिंगपूर तसेच कोल्हापूर शहर दर्शनाचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी उद्यमनगर व एमआयडीसी कोल्हापूर भेट, पन्हाळा गड दर्शन करून सहल परत सिंधुदुर्गनगरी येथे येणार आहे.
या अंतर्गत आपल्या राज्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण घेवाण, सांस्कृतीक वृध्दीकरण व आनंददायी शिक्षण प्राप्त करण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात सुध्दा वृध्दी होण्यासाठी मदत होणार आहे. विद्यार्थ्यांसोबत मोगरणे संयुक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपशिक्षक महेश देवलकर, वेंगुर्ल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.3 उपशिक्षक राकेश देसाई, दहिबाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपशिक्षिका प्रतिक्षा जाधव, हरकुळ नं. 1 , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपशिक्षिका संजना चिंदरकर, नियोजन व सनियंत्रण समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे या सहलीसोबत उपस्थित राहणार आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांना आज दि. 23 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल सिंधुदुर्ग व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर उपस्थित होते. तसेच शाळांचे मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment