जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात येणारे सण-उत्सव हे सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन आनंदाने साजरे करण्याची परंपरा आहे. या काळात जिल्ह्यात सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व समाजघटकांमध्ये संवाद वाढणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच शांतता आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण राहिले असून प्रशासनाला सर्व बांधवांचे सहकार्य मिळत आले आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनीही यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सण-उत्सवाच्या काळात सर्वांनी सामाजिक एकोपा जपणे अत्यंत गरजेचे आहे. समाज माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हा शांतता समितीच्या सदस्यांनीही आपापली मते मांडली. समाजात शांततेचे वातावरण कायम राखण्यासाठी तसेच सण-उत्सव सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील यावरही चर्चा झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस विभागाचे अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'