जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ (जिमाका) पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. पेट्रोलपंप चालक व इंधन कंपन्यांचे सेल्स अधिकारी यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय ठेवून काम करावे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या प्रमुख तेल कंपन्यांचे सेल्स अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोलपंप डिलर्स यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला व उपलब्धतेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रशासन तुमच्या सोबत असल्याचा विश्वास देत, नागरिकांनी कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले. तसेच अफवा किंवा चुकीची माहिती पसरविणे टाळण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'