विधी सेवा प्राधिकरण मार्फत महिला दिनानिमित्त पोक्सो कायद्यावर मार्गदर्शन शिबिर संपन्न
· बालकांचे संरक्षण ही काळाची गरजः 'अॅड. प्रणिता कोटकर- राऊळ यांचे प्रतिपादन
· महिला दिनाचे औचित्य; विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'पोक्सों' वर जनजागृती
सिंधुदुर्गनगरी दिनाक 10 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘पोक्सो’ (Protection of Children from Sexual Offences – POCSO) कायद्यावर विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली.
या शिबिरात मुख्य वक्त्या म्हणून अॅड. प्रणिता कोटकर-राऊळ यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासोबतच बालकांची सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. पोक्सो कायद्यातील तरतुदींची माहिती केवळ कायदेतज्ज्ञांनाच नाही तर प्रत्येक माता-पित्याला, शिक्षकांना आणि सजग नागरिकांला असणे आवश्यक आहे. बालकांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी या कायद्याचे कवच महत्त्वाची ठरते.
या शिबिरात त्यांनी पुढील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला, पोक्सो कायद्याचे स्वरुप: हा कायदा मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी किती कठोर आहे, याची माहिती दिली. मुलांशी संवाद, पालकांनी मुलांशी मुक्त संवाद साधून त्यांना, ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समाजावून सांगण्याचे आवाहन केले.
कायदेशीर प्रक्रिया, घटना घडल्यास घाबरुन न जाता तक्रार कशी करावी आणि पीडित बालकाची ओळख गुप्त ठेवणे किती बंधनकारक आहे, यावरही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश महिंद्रकर, शिक्षक यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहा बालम शिक्षिका यांनी केले.
००००००
Comments
Post a Comment