काचबिंदू डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ वेळेवर निदान गरजेचे
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- काचबिंदू हा डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ असून वेळेवर निदान होणे गरजेचे आहे. ८ मार्च ते १४ मार्च हा कालावधी जागतिक काचबिंदू आठवडा म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
अंधत्व येण्याच्या कारणांपैकी मोतिबिंदूच्या खालोखाल काचबिंदू हे कारण आहे. यामध्ये रुग्णाची नजर हळूहळू कमी होत असल्याने त्याची लवकर जाणीव होत नाही. त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा जातो.तेव्हा त्यांची नजर कायमस्वरूपी गेलेली असते. त्यामुळे काचबिंदूला डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते.
मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर गेलेली नजर संपूर्ण येते. तर काचबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर असलेली नजर टिकविण्याचा प्रयत्न असतो. काचबिंदू हा वाढत जाणारा आजार असून वयाच्या चाळीशीनंतर होणारा आजार आहे. वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, सभोवतालचे कमी दिसणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
डोळ्यांशी संबंधित अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रतज्ञांकडे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment