उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी केले आहे.
प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन खालील समस्या जाणवू शकतात.
अतिसार (Diarrhea) आणि उलट्या, चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जावणणे. डोकेदुखी आणि अस्वस्थता. त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे. उष्माघात हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो.
काय करावे ?
भरपूर पाणी प्या, तहान लागलेली नसली तरही दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्या. घराबाहेर पडताना काळजी, डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. पेय पदार्थांचे सेवन,लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS), नारळ पाणी आणि घरगुती नैसर्गिक पेयांचे सेवन वाढवा.पोशख हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. आहार, आहारात काकडी, टरबूज, द्राक्षे यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा.
काय टाळावे
दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. व्यसने, मदयपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेल्या पेयांचे सेवन टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते. शिळे अन्न, उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते, त्यामुळे शिळे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. श्रमाची कामे, कडक उन्हात कष्टाची किंवा व्यायामाची कामे करणे टाळावे.
उष्माघात झाल्यास करावयाच्या उपायोजना
जर एखाद्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली किंवा बेशुध्द पडल्यास, रुग्णाला तात्काळ सावतील किंवा थंड ठिकाणी न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करावेत. थंड पाण्याने शरीर पुसून काढावे (lce Packs असल्यास मानेवर आणि काखेत ठेवावेत.) रुग्ण शुद्धीवर असल्यास त्याला पाणी किंवा ओआरएस द्यावे. तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे.
लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उष्णतेच्या लाटेत विशेष काळजी घेणे आवश्यक असून कोणताही त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000000
Comments
Post a Comment