प्रजासत्ताक दिनी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत प्रजासत्ताक दिनी ग्रामस्तरावर विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.
राज्यात मार्च २०२४ अखेरपर्यंत ‘हर घर नल से जल’ म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिनांक २६ जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत जलजीवन मिशनचा विषय प्राधान्याने हाताळण्यात यावा. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना गुणवत्तेसह पुरेसे प्रतिमानसी ५५ लिटर व नियमित स्वरुपात पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमांतर्गत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात या योजनेचे काम योग्य पध्दतीने मार्गी लागावे यासाठी लोकसहभाग व पारदर्शकता येऊन व्यापक प्रचार व्हावा व नियोजन व्हावे. ग्रामपंचायत सदस्यासोबत ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात यावे. समिती सदस्यांची ओळख, त्यांचा अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थितांना अवगत करण्यात येणार आहे. गावातील पाणी प्रश्न सोडविण्याकरीता ग्रामस्थांनी या ग्रामसभेला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.नायर यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment