हीच वेळ खरी मलेरीयाला (हिवताप) झिरो करण्याची

भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या समन्वयाने गेल्या काही दशकात मलेरियावर (हिवतापावर) मात करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आज आपण हिवताप दुरिकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार भारतात सन २०३० पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. जगामध्ये दरवर्षी ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. याकरीता हिवताप या किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी सर्वानी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होवु शकतो. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी हीच वेळ खरी मलेरीयाला झिरो करण्याची, हे घोषवाक्य निवडले आहे. हिवताप या आजाराबाबत थोडक्यात माहिती- हिवताप या आजाराचा प्रसार अॅनाफेलीस या डासांच्या मादी मार्फत होतो. निसर्ग निर्मित स्थाने भातशेती, पाण्याची डबकी, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादी तसेच मानव निर्मित डासोत्पत्ती स्थाने नारळांच्या करवंट्या, टायर, उघडयावर पडलेल्या रिकामी बाटल्या, प्लास्टीक डबे इत्यादी. या ठिकाणी साठुन राहीलेल्या पाण्यात डासांची मादी अंडी घालते. हिवताप प्रसारक डासाची मादी पाण्यात सुमारे १५० ते २०० अंडी घालते. अंडी, अळी कोष, प्रौढ डास हे डासाचे जीवनचक्र अंडी घातलेल्या ठिकाणीच ८ ते १० दिवसात पुर्ण होते. हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासुन होतो प्रौढ़ मादी डास दूषित हिवताप रुग्णांस चावतो त्यावेळीस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात. व डासाच्या शरीरात हिवतापाच्या जंतुची वाढ होते. सदर डास निरोगी व्यक्तीस चावल्यास ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. मानवी शरीरात १० ते १२ दिवसात जंतुची वाढ पूर्ण होते. या कालावधीस अधिशयन कालावधी म्हणतात. शरीरात जंतुची वाढ पूर्ण झाल्यावर रुग्णास हिवतापाची लक्षणे दिसावयास सुरवात होते.हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतु पासुन होतो हिवतापाच्या जंतुचे फॅलसिफेरम व व्हायबॅक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात. हिवताप आजारांची सर्वसाधारण लक्षणे:- थंडी वाजून ताप येणे. सतत ताप किंवा एक दिवस आड ताप, तापानंतर घाम येऊन अंग गार पडते, डोकेदुखी व बऱ्याच वेळा उलट्या होतात. फॅलसिफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदुचा हिवताप होवु शकतो. मेंदुचा हिवताप (Cerebral Malaria) :- लक्षणे :- चीव ताप येणे. व्रीव डोकेदुखी उलटया होणे मान ताठ होणे, झटके येणे, बेशुध्द होणे. वेळेत उपचार न मिळाल्यास प्रसंगी मृत्यु होऊ शकतो. हिवताप रोग निदान:- १) प्रयोगशाळेत हिवतापसाठी रक्तनमुना तपासणी करुन घेणे.२) तात्काळ निदान पध्दतीत (RDK) रक्तनमुना घेवून हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. वरील आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या रक्तनमुन्यातच हिवतापाचे जंतु आढळुन येतात. ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाने नजिकच्या शासकिय रुग्णालयात जावुन तपासुन घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळुन आल्यास शासकिय दवाखाने उदा. प्रा. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुणालये, जिल्हा रुग्णालया मधून मोफत संपूर्ण औषधोपचार देण्यात येतो. हिवताप आजारात वाढ अथवा उद्रेक होवु नये म्हणुन आरोग्य विभागाकडून सर्वप्रकारचे नियोजन करणेत आलेले आहेच परंतु त्याच बरोबर समाजातील सर्व स्तरावरील नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या सततच्या व सामुहिक प्रयत्नामुळे हिवताप रुग्णात व हिवतापाने होणाऱ्या मृत्यु मध्ये लक्षणीय घट झाली आहे. भारत सरकारने सन २०३० पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे लक्ष ठरविले आहे त्याकरीता साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाय जनतेने राबविणे आवश्यक आहे. १) कोणत्याही प्रकारचा ताप हा हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया असु शकतो. तरी ताप आल्यास त्वरीत जिल्हा माहिती कार्यालय निम्त्यात रक्त तपासुन घ्यावे. 1) दुषित रुग्णावर सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपचार देणेत येतो. दिलेला उपचार नियमितपणे घ्यावा. डास निर्मिती होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी:- १) पाणी साठवुन ठेवण्याची भांडी घट्ट झाकुन ठेवा. आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. त्यामध्ये घरातील वापरातील पाण्याची भांडी घासुन पुसुन कोरडी करावीत. २) परीसरातील नारळांच्या करवंट्या, टायर, रिकामी बाटल्या व प्लास्टीक डबे नष्ट करा व त्यामध्ये पाणी साठा होवु देवु नका. ३) घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाटीसाठी शोषखडयाचा वापर करा. आजुबाजुची डबकी बुजवा किंवा वाहती करा. घरात व घराच्या आजुबाजुला कोणत्याही प्रकारचे पाणी (स्वच्छ /घाण) आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साचुन राहाणार नाही याची दक्षता घ्यावी ४) रिकामी न करता येणा-या पाणी साठे ज्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करत नाही अश्या पाणीसाठ्यामध्ये अळी नाशक औषध टाकावे किंवा गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे सर्व प्रा. आ. केंद्र स्तरावर मोफत उपलब्ध आहेत. डासाचा उपद्रव टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी:- (५) झोपताना मच्छरदाणीचा किंवा किटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करा किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. ६) घरांच्या खिडक्यांना जाळी बसवा, सेप्टी टॅक व्हेंटपाईपला जाळी बसवा. ७) नेहमी अंगभर कपडे घालावेत.. ८) आपल्या घरी किटकनाशक फवारणी पथक आल्यास संपूर्ण घर फवारून घ्यावे. फवारणी केलेल्या घराची किमान २ ते २.५ महिने रंगरगोटी करू नये. प्रत्येक नागरीकाने वरील सर्व उपाययोजनाचा अवलंब केल्यास डासांची निर्मिती कमी होऊन डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यु, हत्तीरोग, चिकूनगुनिया, जपानी मेंदुज्वर या आजारापासून आपण मुक्त होवु शकतो. व आपण निर्धारित हिवताप दुरिकरण उद्दिष्टांपर्यत पोहोचु शकतो. आपल्या भावी पिढ्यांना किटकजन्य आजार मुक्त जीवन देण्याकरीता डास निर्मितीच होणार नाही याची दक्षता प्रत्येकांनी घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे नियोजन आरोग्य विभाग जि.प. सिंधुदुर्ग व जिल्हा हिवताप विभागा कडुन किटकजन्य आजार रुग्णात वाढ अथवा उद्रेक होवु नये या करीता नियोजन केले आहे. आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच आशा स्वयंसेवक यांना विविध स्तरावर किटकजन्य आजाराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. संभाव्य बाधित भाग कार्यक्षेत्रात नियमित सर्व्हेक्षण व पर्यवेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे.डास अळी घनता वाढु नये याकरीता अळीनाशकांचा पुरवठा प्रा. आ. केंद्राना करणेत आलेला असुन जिल्हा स्तरावरही साठा उपलब्ध ठेवणेत आलेला आहे.संशयित रुग्ण शोधणे करीता रक्तनमुने व रक्तजल नमुने तपासणी करीता योग्य ते नियोजन करणेत आलेले आहे. रुग्ण आढळल्यास त्वरीत उपचारासाठी आवश्यक औषध साठा प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालये/उपजिल्हा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उद्रेकग्रस्त भागात किंवा रुग्ण संख्या वाढ झालेस प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरीता धुरफवारणी यंत्रे/फवारणी पंप साहित्य/किटकनाशक साठा जिल्हा कार्यालयात अद्ययावत ठेवणेत आलेला असुन आवश्यकतेनुसार मागणी करणेच्या सुचना संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती व्हावी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी शहरी व ग्रामीण स्तरावरील जनतेचा कार्यक्रमाप्रती सहभाग मिळावा यासाठी आरोग्य विभाग, जि. प. सिंधुदुर्ग व राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सिंधुदूर्ग सतत प्रयत्नशील आहे. -रणजित पवार उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय,सिंधुदुर्ग ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'