पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि.3(जि.मा.का): नाविण्यापूर्ण राज्यस्तीरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई - म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्य संगोपनासाठी निवास शेड उभारणीस अर्थ सहाय देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25 अधिक 3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021- 22 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
या योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील व ऑलाईन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ॲड्रॉईड मोबाईच्या AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअर वरही माहिती अपलब्ध आहे. अर्ज करण्याचा कालावधी 4 डिसेंबर 2021 ते 18 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418 वर संपर्क सांधावा. ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारले जातील.
या संगणकप्रणीलीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबरच जिल्ह्यास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये,यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपलकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून,त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्य्कीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभातर्फे करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment