भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिर व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, वेंगुर्ला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचे सहायक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे, नगरपंचायत वेंगुर्लाच्या आरोग्य सभापती गौरी माईणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, डॉ. सुप्रिया रावळ (आर.बी.एस.के.), आयुष अधिकारी डॉ. संजीवनी लंबे आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य सेविका, औषध निर्माता, आरोग्य मित्र, पी.एम.डब्ल्यू. व मदतनीस उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे महत्त्व विशद करून आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य शिबिरामध्ये वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधव, महिला व बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार औषधोपचार केले. तसेच दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेणे, स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आदिवासी कल्याणकारी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आरोग्य शिबिराला आणि योजनाविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाला वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'