भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कुडाळ येथील कातकरी वस्तीत आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथील तुपटवाडी कातकरी वस्तीत आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्मान आरोग्य मंदिर, पणदूर अंतर्गत उपकेंद्र कुडाळ क्रमांक २ येथे हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण येथील वरिष्ठ लिपिक रोशन डिसोजा यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी श्री. ठाणेकर, आरोग्य सहाय्यक आर. डी. चेंदवणकर, आरोग्य निरीक्षक एम. बी. तेली, आरोग्य निरीक्षक पणदूर वाय. एस. आरोसकर आदी उपस्थित होते. तसेच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य मित्र, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. या शिबिरादरम्यान तुपटवाडी येथील कातकरी वस्तीमधील एकूण २३ पुरुष, महिला व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच दैनंदिन आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी वस्त्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे आणि आरोग्य व पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराला तुपटवाडी येथील कातकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'