खरीप हंगाम २०२६-२७ साठी ई-पीक पाहणी नोंदणीस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग, दि. १३ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६-२७ करिता डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करताना उद्भवलेल्या तांत्रिक व अनुषंगिक अडचणी लक्षात घेता, ई-फेरफार प्रणालीद्वारे ग्राम महसूल अधिकारी स्तरावर पीक नोंदणी करण्यासाठी शासनाने ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करताना सर्व्हर अनुपलब्धता, जिओ-लोकेशनमधील त्रुटी, गावांच्या नकाशांमधील तफावत तसेच काही गट क्रमांक उपलब्ध नसणे अशा तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना DCS ॲपद्वारे पीक नोंदणी करणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी शासनाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ई-फेरफार प्रणालीतील ई-पीक मॉड्यूलद्वारे ग्राम महसूल अधिकारी स्तरावर गाव नमुना क्रमांक १२ मध्ये पीक नोंदणी करण्याची पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली होती. सुरुवातीला ही सुविधा ६ ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, हा कालावधी कमी असल्याने तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या पीक नोंदी अचूक व परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाने १३ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्राद्वारे या सुविधेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. तरी, खरीप हंगाम २०२६-२७ मधील ज्या खातेदारांची ई-पीक पाहणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी आपल्या संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ई-फेरफार प्रणालीद्वारे पीक नोंदणीची प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांच्यावतीने करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'