वनराई बंधाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात जलसंधारणाला हातभार – खा. नारायण राणे हुंबरट येथे बंधाऱ्याची पाहणी

सिंधुदुर्ग, दि.०१ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाभरात लोकसहभागातून राबविण्यात आलेली जलसंधारणाची मोहीम कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून १० हजारांहून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पाणी अडविणे आणि जलसंधारणाच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केली. कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ जवळ ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची खासदार नारायण राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून अशा प्रकारचे अधिकाधिक बंधारे उभारल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या या कामात प्रशासनासोबतच स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्याच्या अशा प्रयत्नांमुळे भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असून, भविष्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील, असेही खा. राणे यांनी नमूद केले. यावेळी कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, उपसरपंच नितीन बागवे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संतोष चव्हाण, सदस्य संदीप होळकर, नितीका बागवे, पोलीस पाटील बाबू गुरव, कोतवाल प्रदीप जाधव, गणेश गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'