दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करावा

सिंधुदुर्ग, दि. ४ (जिमाका) : जिल्ह्यातील दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दरमहा अनुदान अदा करण्यात येते. जिल्ह्यातील एकूण ३३ लाभार्थ्यांना या अनुदानाचा लाभ मिळत असून, शासनाच्या नियमानुसार अनुदान सुरू ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला व आवश्यक कागदपत्रे सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावीत. शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी ३१ मे आणि ३० नोव्हेंबर या दोन मुदतींना लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतरच मासिक अनुदान अदा करण्यात येते. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील पात्र माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी संबंधित बँक, सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडून स्वाक्षरी व शिक्क्यासह हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा. या दाखल्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र आणि बँक पासबुकच्या छायांकित प्रती जोडून विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर कराव्यात. निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला कार्यालयास प्राप्त न झाल्यास दि. १ डिसेंबर २०२६ पासून संबंधित लाभार्थ्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० किंवा ९८३४४६५९०४ या क्रमांकावर संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'