बालस्नेही ग्रामपंचायतींच्या उपक्रमांचे मिलन जंगम यांच्याकडून कौतुक पाडलोस व मडुरे ग्रामपंचायतींना भेट; बालकांशी साधला संवाद, बालकेंद्रित उपक्रमांचा घेतला आढावा

सिंधुदुर्ग, दि. १९ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या मिलन जंगम यांनी १४ व १५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान बालदिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस व मडुरे या बालस्नेही ग्रामपंचायतींना भेट दिली. यावेळी त्यांनी गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या बालकेंद्रित उपक्रमांची पाहणी करून बालकांशी संवाद साधला. मुलांचा उत्साह, सामाजिक जाणीव आणि ग्रामविकासातील त्यांचा सक्रिय सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. पाडलोस ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बालसभेत मुलांनी गावात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच उत्स्फूर्तपणे आपले विचार मांडले. गावात पूर्वी एसटीची सुविधा उपलब्ध नव्हती. हा प्रश्न मुलांनी बालसभेत मांडून त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गावात एसटीची सुविधा उपलब्ध झाली. मुलांच्या पुढाकारामुळे गावाची महत्त्वाची गरज पूर्ण होणे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. याशिवाय मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन बंधारे बांधले असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मुलांसाठी वाचनालय आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यावेळी मुलांनी जिल्हाधिकारी ते गटविकास अधिकारी अशा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारत सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. या माध्यमातून मुलांना प्रशासकीय यंत्रणेची कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळाली. बाल संसदेसाठी निवड झालेल्या पाडलोस येथील सानिका गावडे आणि मडुरे येथील पियू नाईक यांचा मिलन जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बांधलेल्या बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणीही त्यांनी केली. मडुरे ग्रामपंचायतीचा मोबाईलमुक्त बालपणाचा संकल्प मडुरे ग्रामपंचायतीमध्ये बालसभेच्या माध्यमातून ‘मोबाईल बंद’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. मुलांमधील वाढता मोबाईल वापर लक्षात घेऊन त्यांना मैदानी खेळ, वाचन, अभ्यास आणि सर्जनशील उपक्रमांकडे वळविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि बालसभा सदस्यांसोबत बैठक घेऊन गावात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मुलांचे विचार जाणून घेत त्यांच्या पुढाकाराचे कौतुक करण्यात आले. बालविकासासाठी विविध उपक्रमांचे सादरीकरण सावंतवाडी तालुक्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी बालवाडी शिक्षिकांनी आकर्षक माहितीपर स्टॉल उभारले होते. मिलन जंगम यांनी या स्टॉलना भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. बालस्नेही गाव म्हणजे केवळ मुलांसाठी सुविधा निर्माण करणे नव्हे, तर गावाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे, त्यांच्या समस्यांना प्राधान्य देणे आणि त्यांच्या मतांचा आदर करणे होय. पाडलोस येथील एसटी सुविधेसाठी मुलांनी केलेला पाठपुरावा, स्वतः बांधलेले बंधारे आणि मडुरे येथील मोबाईलमुक्त बालपणाचा संकल्प हे उपक्रम मुलांमधील नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची क्षमता अधोरेखित करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिनिधी छाया घाडीगांवकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उदय मालवणकर, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, बाल संरक्षण अधिकारी दिपिका सावंत यांच्यासह दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व बालवाडी शिक्षिका उपस्थित होते. बालकांच्या सहभागातून गावाच्या विकासाला दिशा देणारे पाडलोस आणि मडुरे ग्रामपंचायतींचे उपक्रम बालस्नेही गाव संकल्पनेचे प्रभावी उदाहरण ठरत आहेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'