भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मोंड निकमवाडी येथे आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिर
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १६ नोव्हेंबर रोजी मोंड निकमवाडी, ता. देवगड येथे आदिवासी बांधवांसाठी विशेष कार्यक्रम व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या ऐतिहासिक कार्याची, त्यांच्या समाजासाठीच्या योगदानाची तसेच जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाच्या आयोजनाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला मोंडचे सरपंच अभय बापट, मंडळ अधिकारी विनायक शेट्ये, संरक्षण अधिकारी गौरव अण्णासाहेब एखंडे, ग्राम महसूल अधिकारी पी. व्ही. वळंजू, इंदिरा गांधी योजना अव्वल सुधीर साळुंखे, महसूल सहायक पी. ए. कदम, महसूल सेवक मिलिंद राणे, संरक्षण अधिकारी गौरी अण्णासाहेब एखंडे तसेच मंडळातील अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बालकांचे विविध हक्क आणि त्यांच्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेविषयी आणि कायदेविषयक अधिकारांविषयी जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला मोंड निकमवाडी येथील आदिवासी बांधवांसह माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
000000

Comments
Post a Comment