कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंधासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा

जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांना आवाहन सिंधुदुर्ग, दि. २७ : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानपूर्वक व भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पात्र आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती (Internal Committee – IC) स्थापन करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांच्या प्रमुखांना समिती स्थापन करून तिची माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ (POSH Act, 2013) नुसार ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. यामध्ये कंपन्या, बँका, रुग्णालये, हॉटेल्स, मॉल्स, शैक्षणिक संस्था तसेच इतर आस्थापनांचा समावेश आहे. ज्या आस्थापनांमध्ये अद्याप अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात आलेली नाही, त्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ समिती गठित करावी. तसेच ज्या आस्थापनांनी समिती स्थापन केली आहे, त्यांनी समितीची माहिती, अध्यक्ष व सदस्यांची नावे आणि आवश्यक तपशील केंद्र शासनाच्या SHE-Box या अधिकृत पोर्टलवर नोंदवून अद्ययावत करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र शासनाचे https://shebox.wcd.gov.in/ हे अधिकृत पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. POSH अधिनियम, २०१३ मधील कलम ४ नुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक असून, कलम २६ नुसार कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित आस्थापनाचा परवाना किंवा नोंदणी रद्द करण्याची अथवा नूतनीकरण नाकारण्याची कारवाईही होऊ शकते. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, सन्मानजनक व लैंगिक छळमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रत्येक आस्थापना प्रमुखाची कायदेशीर व सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी तातडीने अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची माहिती SHE-Box पोर्टलवर नोंदवावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यांच्यामार्फत प्रसिदीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'