पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जनजातीय गौरव दिनानिमित्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा, दिवाळी फराळाचेही वाटप

सिंधुदुर्ग, दि. १५ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिन’ व ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह-२०२६’ अंतर्गत कणकवली येथील गणपती साना येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ, जातीचे प्रमाणपत्र वितरण, समाजबांधवांचा सन्मान आणि दिवाळी फराळाचे वाटप अशा उपक्रमांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, प्रांताधिकारी जगदीश काटकर, प्रभारी तहसीलदार विजय वरक, कणकवली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर, उदय अहिर, मंगेश मस्के, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे यांच्यासह नगरपरिषदेचे नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते. सहायक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात आदिवासी समाजबांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी मोठा संघर्ष करून इतिहास घडविला. आदिवासी समाजातील मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने त्यांनी कार्य केले. अशा महापुरुषांच्या विचारांना अनुसरून शासनाने विविध योजना राबविल्या असून अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. आदिवासी समाजाला हक्काची जमीन, स्वतःची घरे आणि मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कार्यक्रमात लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या प्रमाणपत्रांमुळे आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मदत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातकरी आणि ठाकर समाजाची लोकसंख्या तुलनेने कमी असली, तरी या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत यावर्षी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी वर्षभरात खर्च करण्यात येणार आहे. कातकरी समाजातील नागरिकांना दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शासनाची आहे. आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना इतर समाजातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च आणि दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील कातकरी आणि ठाकर समाजाच्या वसाहतींमध्ये जाऊन आरोग्य व स्वच्छता शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती, समुपदेशन आणि मार्गदर्शन थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या अल्प असली, तरी प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणे, या समाजाचे अस्तित्व आणि संस्कृती जतन करणे तसेच जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ***

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'