आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व नाचणी विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू

सिंधुदुर्ग, दि. ४ (जिमाका) : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात धान (भात) व नाचणी (रागी) खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात नाचणी खरेदीसाठी एक आणि धान खरेदीसाठी ४० खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा धान खरेदी समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नाचणी खरेदीसाठी वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित, वैभववाडी हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. धान खरेदीसाठी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, डेगवे, तळवडे, कोलगाव, भेडशी, मडुरा व इन्सुली येथे केंद्रे कार्यरत असतील. कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत कुडाळ, माणगाव, कडावल, घोडगे, कसाल, निवजे, निरुखे, पिंगुळी, गोटोस, वेताळबांबार्डे, पणदूर, पाट, हिर्लोक, तुळस व केरवडे येथे खरेदीची सुविधा उपलब्ध असेल. कणकवली तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत कणकवली, सांगवे, घोणसरी, लोरे नं. १ व फोंडा येथे, तर वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत वेंगुर्ला येथे खरेदी करण्यात येणार आहे. तसेच देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत देवगड व पडेल येथे, वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत वैभववाडी व करुळ येथे, मालवण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत पेंडूर व गोठणे येथे, तर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संघ मर्यादित, ओरोस यांच्यामार्फत ओरोस, कट्टा, तळगाव व आचरा येथे धान खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. तसेच सन २०२६-२७ या हंगामातील नाचणी अथवा भात पिकाची नोंद असलेला ई-पीक पाहणी नोंदणीचा सातबारा उतारा व ८-अ, आधारकार्डची छायांकित प्रत, आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक पासबुकची प्रत आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाचणीसाठी प्रतिक्विंटल ५ हजार २०५ रुपये, तर सर्वसाधारण धानासाठी प्रतिक्विंटल २ हजार ४४१ रुपये दर देण्यात येणार आहे. दोन्ही पिकांच्या विक्रीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. नाचणीची खरेदी १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत, तर धानाची खरेदी १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत करण्यात येणार आहे. खरीप पणन हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा समन्वय समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या संबंधित धान व नाचणी खरेदी केंद्रावर स्वतः उपस्थित राहून शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी आणि किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे कोकण विभाग संचालक प्रमोद रावराणे आणि जिल्हा पणन अधिकारी एस आर आभाळे यांनी केले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'