डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५ मध्ये निवृत्तीवेतनधारकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्ग, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व कोषागार निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेला हयातीचा दाखला ‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे डिजिटल स्वरूपात सादर करावा. देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५ जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
कार्मिक, लोकशिकायत व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग तसेच वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. यावर्षी हा दाखला डिजिटल पद्धतीने सादर करण्यासाठी विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ ॲपच्या माध्यमातून स्वतः डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. तसेच निवृत्तीवेतन मिळत असलेल्या बँकेच्या शाखेत, जिल्हा कोषागार कार्यालयात किंवा संबंधित उपकोषागार कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करताना लाभार्थ्यांनी आपले नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदवावा. वितरण संस्था व कोषागार निवडताना ‘Maharashtra State Treasury’ आणि संबंधित कोषागार म्हणून ‘Sindhudurg DTO’ अर्थात जिल्हा कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांची योग्य निवड झाल्याची खात्री करावी.
तालुकानिहाय डिजिटल जीवन प्रमाणपत्र मेळावे
जिल्ह्यातील अभियान शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालये, बँका तसेच जिल्हा व तालुका पेन्शनर संघटनांच्या समन्वयाने १६ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकास्तरावर मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यांची सुरुवात १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी आणि कणकवली येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखांमध्ये होणार आहे. १७ नोव्हेंबर रोजी मालवण व कुडाळ, १८ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला व देवगड, तर १९ नोव्हेंबर रोजी वैभववाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दोडामार्ग तालुक्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी साटेली-भेडशी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून मेळावा होणार आहे.
आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे
जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित मेळाव्यास उपस्थित राहताना पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच आवश्यक संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याबाबत अधिक माहिती किंवा सहाय्य आवश्यक असल्यास जिल्हा कोषागार कार्यालय, संबंधित तालुक्यातील उपकोषागार कार्यालय अथवा आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या अभियानात सहभागी होऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे आणि ‘देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५’ शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. शासनाच्या ‘चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार’ या उद्दिष्टालाही या अभियानाच्या माध्यमातून बळ मिळणार आहे.
00000000

Comments
Post a Comment