भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कुंभारमाठ येथे आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिर

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १६ नोव्हेंबर रोजी कुंभारमाठ, ता. मालवण येथे विशेष कार्यक्रम व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या हक्कांविषयी आणि कायद्यांविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एम. पी. खोत/हजारे, नोडल अधिकारी विशाल घोरपडे, महिला व बाल विकास विभागाचे एम. जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या रुपाली प्रभू, पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, सरपंच पूनम वाटेगावकर, भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी संजय नरे आदी उपस्थित होते. तसेच मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक, पुरवठा निरीक्षक, महसूल सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाची माहिती देऊन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आदिवासी बांधवांना देण्यात आली. तहसीलदार गणेश लव्हे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शासनामार्फत विविध शासकीय कागदपत्रांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. तसेच महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा आणि महिलांच्या संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून उपस्थितांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली. या मार्गदर्शन शिबिराला कुंभारमाठ येथील नागरिकांसह माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'