रॅगिंगविरोधी कायदे व पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जिमाका) : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने एस. एल. देसाई विद्यालय, पाट येथे रॅगिंगविरोधी कायदे तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम, 2012 या विषयांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर, पॅनल विधीज्ञ ॲड. प्रणिता कोटकर, शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. प्रणिता कोटकर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो अधिनियम, 2012 विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी हा कायदा प्रभावी संरक्षण देणारा असून त्याची माहिती केवळ कायदेतज्ज्ञांनाच नव्हे, तर पालक, शिक्षक आणि प्रत्येक सजग नागरिकाला असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाची ओळख, मुलांशी मुक्त संवादाचे महत्त्व, अत्याचाराची घटना घडल्यास तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच पीडित बालकाची ओळख गोपनीय ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम स्पष्ट करताना नवीन विद्यार्थ्यांची चेष्टा करणे, मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे किंवा भीतीचे वातावरण निर्माण करणे ही गंभीर स्वरूपाची कृत्ये असून त्यावर कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहून परस्पर सन्मानाची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचेही आवाहन केले. 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालवू नये. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास संबंधित वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. साळसकर यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment