पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मसुदा अधिसूचना; 60 दिवसांत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जिमाका) : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने पश्चिम घाट परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) म्हणून घोषित करण्यासाठी 27 जुलै 2026 रोजी मसुदा अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या मसुदा अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतील 56 तालुक्यांमधील 2 हजार 515 गावांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील 198 गावांचा समावेश प्रस्तावित आहे.
या प्रस्तावित अधिसूचनेमुळे परिणाम होणारे स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, संस्था तसेच संबंधित भागधारकांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांनुसार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्या हरकती अथवा सूचना केंद्र शासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरकती व सूचना पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर टपालाद्वारे किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठविता येतील.
०००००
Comments
Post a Comment