सोमवारी 31 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय संस्था व परिसरात विशेष स्वच्छता अभियान ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका) : स्वच्छ, सुंदर व निरोगी सिंधुदुर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दि. 31 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच आरोग्य उपकेंद्रांच्या परिसरात विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आरोग्य कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे. स्वच्छता ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. या भावनेतून नागरिकांनी आपल्या गावाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. या स्वच्छता अभियानांतर्गत संबंधित शासकीय संस्था व त्यांच्या परिसराची स्वच्छता, कचरा संकलन व वर्गीकरण, प्लास्टिक तसेच इतर घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट, परिसर सुशोभीकरण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचरा उघड्यावर न टाकणे, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचे प्रभावी नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी स्वतः स्वच्छता अभियानात सहभागी होऊन ग्रामस्थांना स्वच्छतेसाठी प्रेरित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ गाव – सुंदर गाव – निरोगी गाव’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रमोद कामत प्रमोद कामत यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्याबाबतच्या सूचना सर्व गट विकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'