राज्यात २०४ आश्रमशाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी आदिवासी विकास विभागाचा ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’; ‘सीएसीआर’सोबत सामंजस्य करार

सिंधुदुर्ग (जिमाका), दि. २५ : राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमधील अॅनिमिया (रक्तक्षय) समस्या दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘अॅनिमिया निवारण कार्यक्रम’ युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील २०४ शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनी आहेत. अॅनिमियामुक्तीसाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन पातळी तपासण्यात येत आहे. नाशिक विभागात सर्वाधिक ४१,४६९ विद्यार्थ्यांची तपासणी नाशिक विभागातील १०४ शाळांमधील ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांमधील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांमधील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य शाळांमधील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ठाणे विभागातील ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांमधील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांमधील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य शाळांमधील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूर विभागात अनुक्रमे २ हजार ८९८ आणि १ हजार ८३१ विद्यार्थ्यांच्या एचबी पातळी मोजण्यात आली आहे. अमरावती विभागात ८ शासकीय आश्रमशाळांमधील १ हजार ८८५ विद्यार्थी आणि ३ अनुदानित आश्रमशाळेच्या 1 हजार १३ विद्यार्थ्यांची, तर नागपूर विभागात २ शासकीय आश्रमशाळांमधील ५३६ विद्यार्थी आणि ५ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार २९५ विद्यार्थ्यांच्या हिमोग्लोबिन तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली. एचबीचे प्रमाण कमी आढळलेल्या विद्यार्थ्यांना पूरक आहार तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळून आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यक पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राखणे, अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. 000000 संरक्षण मंत्र्यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी सिंधुदुर्गनगरी, दि. २५ : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीनुसार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित वेळेनुसार दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेकपोस्टवरून पत्रादेवीमार्गे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहनचालकांनी या कालावधीत पत्रादेवीमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'