शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी, 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी, (जिमाका) दि. 4 : कृषी विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत 'राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे' ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक ज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची आणि आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन तसेच चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे. योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित 50 टक्के रकमेचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहील. या योजनेसाठी अर्जदार हा मुख्य व्यवसाय शेती असलेला शेतकरी असावा. अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक असून अर्ज सादर करताना वय किमान 25 वर्षे पूर्ण असावे. शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस लाभ देण्यात येईल. अर्जदाराकडे किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक असून एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक आहे. तसेच अर्जदार कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए (CA), अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासकीय अर्थसाहाय्याने परदेश अभ्यास दौरा केलेला नसावा. जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने व्हिडिओग्राफीसह सोडत (लॉटरी) काढून करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत किमान एक महिला शेतकरी तसेच किमान एक राज्य अथवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य राहील. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र 1), स्वयंघोषणापत्र, हमीपत्र (प्रपत्र 2), आधार कार्ड, फार्मर आयडी, पासपोर्टची छायांकित प्रत, शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांसह आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 20 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'