सारथीच्या विविध कृषी व कृषीपूरक प्रशिक्षणांचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

सिंधुदुर्ग (जिमाका), दि. २५ : महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे. अर्जाच्या अंतिम मुदती पुढीलप्रमाणे : शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षण : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असून, आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२६ आहे. ड्रोन पायलट प्रशिक्षण : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सारथी संस्थेच्या संबंधित विभागीय कार्यालयास १५ दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे. मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित विभागीय कार्यालयास १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात. कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण : ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे संबंधित सारथी विभागीय कार्यालयास १० दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठीचे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात व माहितीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथीचे संकेतस्थळ sarthi-maharashtra.gov.in असून, शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी sarthi.mahamcdc.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. या प्रशिक्षणांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणांचा लक्षित गटातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'