जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खताची उपलब्धता
सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्यासाठी एकूण 19000 मे. टन खताच्या मागणीच्या प्रमाणात राज्य शासनाकडून 12,259 मे.टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. मंजूर आवंटनानुसार माहे एप्रिल 916 मे.टन, माहे मे 1422 मे.टन, माहे जून 2887 मे.टन, माहे जुलै 2765 मे.टन, माहे ऑगस्ट 2337 मे.टन आणि माहे सप्टेंबर 1932 मे.टन याप्रमाणे खताचा पुरवठा करण्याबाबत सर्व खत पुरवठादार कंपनींना आराखडा ठरवून दिलेला आहे.
सद्यस्थितीत माहे जून अखेर मंजूर आवंटननुसार एकूण 5225 मे.टन खताचा पुरवठा अपेक्षित असताना आज अखेर एकूण 7966. 875 मे. टन खताचा पुरवठा झालेला आहे. हे प्रमाण एकूण मंजूर आवंटनाच्या 65 टक्के असून माहे जूनमधील मंजूर आवंटनाच्या 152 टक्के इतके आहे.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. (RCF) आणि पॅरादीप फॉस्फेटस लिमिटेड (PPL) या प्रमुख खत पुरवठादार कंपनीमार्फत या महिनाखेर अजून 1500 मे.टन खत पुरवठा करण्याचे काम सुरु आहे. RCF कंपनीची रेक रत्नागिरी येथे दाखल झाली असून त्यातून 1000 मे. टन युरिया खताचा पुरवठा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुरु केलेला आहे.
केंद्र शासनच्या अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत खत या निविष्ठाचा अंतर्भाव असून सर्व अनुदानित खते पॉस मशीनद्वारे विक्री करावयाचे बंधनकारक आहे. यावर्षीपासून L-1 बायोमेट्रिक पॉस मशीनचा वापर सुरु झालेला असून बऱ्याच विक्री केंद्रांनी त्यांच्या पॉस मशीनवरील खत साठा खतवलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात खत साठा कमी झालेला असला तरीही पॉस मशीनवर साठा शिल्लक दिसत असल्यामुळे पुरवठादार कंपनीकडून खत पुरवठा करताना मर्यादा येतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विक्रेत्यांच्या पॉस मशीनवर अतिरिक्त खत साठा शिल्लक दिसत आहे, अशा विक्रेत्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment