ढोल-ताशा, उंट-घोडे, ऐतिहासिक-पौराणिक देखावे, सजलेले मालवणवासियांच्या जल्लोषात पर्यटन दिंडी
सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का): डौलाने फडकणारा जरीपटका, ढोल-ताशांच्या गजरात, भरजरी पोशाखात सजलेले मालवणवासीय, ऐतिहासिक-पौराणिक देखाव्यांच्या जल्लोषी प्रदर्शनात मालवण नगरपरिषदेची आज पर्यटन दिंडी निघाली.
मालवण नगरपरिषदेच्या 'जल्लोष २०२२' अंतर्गत पर्यटन महोत्सवात आज पर्यटन दिंडी निघाली. प्रशासाक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या दिंडीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी अवधूत तावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ प्रमुख उपस्थित होते.
सजवलेल्या रिक्षा, बैलगाड्या, उंट, घोडे, मानवी कोंबडे, पोपट आणि मोर यांनी दिंडीत आगळा रंग भरला. उंटावर स्वार झालेला श्रीकृष्ण, घोड्यावर स्वार झालेली चिमुकली आणि भगवान शिवशंकराची वेशभूषा केलेला बालक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.शहरातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते. हजारो मालवणवासीय आणि बाहेरुन आलेल्या पर्यटकांनी दिंडीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात आणि मोबाईलमध्ये साठवून घेतला.या दिंडीच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या नेतृत्वाखाली कल्पक आणि नेटक्या नियोजनाचे दर्शन घडवले. अपूर्व उत्साहाने हजारोंच्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय त्याची साक्षच देत होता. अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असला तरी प्रशासनाने त्याला दणक्यात सुरुवात केली.
दिंडीने या पर्यटन महोत्सवाचा मंगल आणि जल्लोषी प्रारंभ केला. भरड नाका ते नगर परिषद अशा या दिंडीने मालवण नगरी दुमदुमून गेली. आजच्या या दिंडीने १३, १४ आणि १५ मे रोजी दांडी किनारा पर्यटकांच्या उदंड प्रतिसादाने गजबजून जाईल, याची खात्रीच पटली.
00000



Comments
Post a Comment