मालदाराच्या दवंडीने जमली जनता; महाराजांच्या दरबारात सुरु होतो शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा जागर
सिंधुदुर्गनगरी दि. 10 ( जि.मा.का) : महाविकास आघाडीने 2 वर्षात राबवलेल्या लोक कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलावल्याची दवंडी मालदार पिटतो आणि महाराजांच्या दरबारात जनता दाखल होते. प्रधान महाराजांना माहिती देण्यासाठी अधिकारी आले असल्याचे सांगून महाराजांच्या परवानगीने अधिकाऱ्यांना योजना व उपक्रमांची माहिती देण्यास सांगतो. अशा प्रकारे सुरुवात होते कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याच्या कार्यक्रमाची.
महाराज, प्रधान, अधिकारी यांच्या संवादांच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना असो वा आरोग्य क्षेत्रात शासनाने केलेले दोन वर्षातील काम असो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात, मच्छिमारांसह तौक्ते वादळातील आपादग्रस्तांना दिलेली मदत, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गोर गरिबांना दिलेला आधार, स्वच्छ महाराष्ट्र, रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या भरीव कामगिरीची माहिती जनतेला दिली जाते.
लोककलांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे हे अभियान माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हाभर सुरू आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे विश्राम अदिवासी कला अंगण ट्रस्ट, शाहिर कल्पना माळी आणि चैतन्य महिला विकास मंडळ या संस्था जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये या कार्यक्रमाचे सादरीकरण करत आहेत.
* सोबत फोटो जोडला आहे.
00000
Comments
Post a Comment