१५९ पात्र कलाकारांचे प्रस्ताव अर्थसहाय्यासाठी पाठवावेत - निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड
सिंधुदुर्गनगरी दि.11 (जि.मा.का): प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकारांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र 159 कलाकारांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत. अपात्र 79 प्रस्तावात कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचा पुरावा घेण्यात यावा, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली.
प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकारांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अर्थसहाय्य करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक झाली. याबैठकीला समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, प्र.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी ॲन्थोनी थॉमस, उपस्थित होते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्याम चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली. एकूण 240 प्रस्तावांपैकी 159 प्रस्ताव पात्र असून 79 प्रस्ताव हे केवळ 15 वर्ष कलेच्या क्षेत्रात कार्यरत असल्याबाबतचा पुरावा जोडला नसल्याने अपात्र झाल्याचे त्यांनी सांगितले. 1 प्रस्ताव दुबार व अन्य 1 उत्पन्न जादा आहे असे 81 प्रस्ताव अपात्र आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, पात्र असणारे प्रस्ताव अर्थसहाय्यांसाठी पाठवावेत आणि अपात्र अपात्र 79 प्रस्तावात कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचा पुरावा घेण्यात यावा असेही ते म्हणाले. याबैठकीत कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याची अट शिथील करण्याची मागणी समाज कल्याण सभापती श्री. जाधव यांनी केली. याबाबत शासनाकडे मागणी केली जाईल असे श्री. भडकवाड म्हणाले.
या बैठकीला कला क्षेत्राशी निगडीत कलाकार बाळकृष्ण नामये, बाळकृष्ण बोभाटे, भालचंद्र केळूसकर, सुहास माळकर, यशवंत थोटम, देवेंद्र नाईक, अमित मिस्त्री, सुभाष लोंढे आदींनी चर्चेत भाग घेतला.
०००००
Comments
Post a Comment