जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी दि. 2 ( जि.मा.का) : जिल्ह्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांनी कोविड 19 संबंधाने मार्गदर्शक सूचनांचे, कोविड अनुरुप वर्तणूकीचे काटेकोरपणे पालन करून उपलब्ध पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था व इतर उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध असल्यास ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबत त्यांच्यास्तरावर निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.
या आदेशात म्हटले आहे. सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये सुरू करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांचे हिताचे राहील. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दि. 25 जानेवारी 2022 चे परिपत्रक व कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्निक महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्याअर्थी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे कलम 2 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील महाविद्यालयातील नियमित वर्ग पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून दि. 1 मार्च 2022 पासून सुरू करण्यास आदेश निर्गमित करीत आहे.
अटी व शर्ती
1) जिल्ह्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालयांनी कोविड 19 संबंधाने मार्गदर्शक सूचनांचे, कोविड अनुरुप वर्तणूकीचे काटेकोरपणे पालन करून संबंधित महाविद्यालयाकडे उपलब्ध पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था व इतर उपयुक्त सोयीसुविधा उपलब्ध असल्यास महाविद्यालयांचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याबाबत त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा. सदर निर्णय घेण्यासाठी महाविद्यालयांना मुभा राहील.
2) ज्यांनी कोविड 19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. अशा विद्यार्थी - विद्यार्थिनींना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी राहील. तथापी लसीकरण ( दोन्ही डोस ) न झालेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
3) संबंधित विद्यापीठाच्या सुचनेप्रमाणे किंवा स्थानिक स्तरावरील महाविद्यालयांनी घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांच्या सूचनेनुसार किंवा महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
4) परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन करण्यासाठी महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पडण्याच्या दृष्टीने महाविद्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना, प्रश्नसंच, हेल्पलाईन नबंर इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी.
5) महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.
6) वसतीगृहे टप्प्या - टप्प्याने सुरू करण्याबाबत विद्यापीठ, संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे व संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याशी विचार विनिमय करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
7) ज्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कोविड 19 ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक प्रशासनाशी, आरोग्य विभागाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.
8) जिल्ह्यातील महाविद्यालयांनी कोविड 19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामाच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्य प्रणाली तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.
सदर आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघ करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
00000
Comments
Post a Comment