वारस नोंदणीबाबत सर्कलस्तरावर शिबीरांचे आयोजन करा - प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – कोविड 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची वडिलोपार्जित मालमत्ता व इतर संपत्तीवरील हक्कांचं संरक्षण व्हावे यासाठी वारस नोंदीसाठी सर्कल स्तरावर शिबीरांचे आयोजन करावे. याच शिबीरात सर्व योजनांची माहिती विधवांनाही करून द्यावी, अशी सूचना प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी. बी. म्हालटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रतिनिधी डॉ. संदेश कांबळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे जिल्हा समन्वयक सदानंद धुमाळ, चाईल्ड लाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रियांका घाडी, शासकीय मुलांचे निरीक्षण गृहाचे अधीक्षक बी.जी.काटकर, संरक्षण अधिकारी उदय मालवणकर, कार्यालय अधिक्षक पल्लवी मळीक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 288 असून दोन्ही पालक मयत बालके 18 असे एकूण 306 बालके आहेत. 717 विधवा असून 717 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. अनाथ प्रमाणपत्रासाठी 18 प्रस्ताव उपआयुक्तालयाकडे सादर करण्यात आले आहेत. या पैकी 8 प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. 18 बालकांचे संयुक्त खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यात आले आहे. तसेच दोन्ही पालक गमावलेल्या 14 बालकांना 5 लक्ष रुपयांची मुदत ठेव प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. 282 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. 149 विधवा महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. फड म्हणाले, एक पालक मयत, दोन्ही पालक मयत अशा प्रकरणात कुणी शासकीय अधिकारी, कर्मचारी असेल तर त्यांचे निवृत्ती वेतन सुरू झाले का? याबाबतही आढावा घेण्यात यावा. इतर जिल्ह्यामधून आपल्या जिल्ह्यात स्थलांतरीत झालेल्या विधवांच्या बाबतही नोंदी घ्याव्यात. शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी तसेच प्राधान्य कुटुंबात त्यांचा समावेश आहे का याबाबतही खात्री करावी. ज्या 114 विधवा महिलांनी अद्यापही अर्ज केलेला नाही त्यांच्याशी संपर्क करून त्यांना अर्ज करण्याबाबत सूचना द्यावी. सर्कल स्तरावर शिबीराचे आयोजन करून या शिबीरात वारस नोंदणी करण्यात यावी. त्यासाठी नोटीस अर्ज सोबत ठेवा. त्याच ठिकाणी सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ देण्याबाबत अर्ज भरून घ्यावेत आणि त्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करावा. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'