12 वी च्या परीक्षा शुक्रवारपासून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी नोंदणी
सिंधुदुर्गनगरी दि. 3 ( जि.मा.का) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ 12 वी ची लेखी परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्च 2022 ते गुरुवार दि. 7 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 17 हजार 611 विद्यार्थी , 6 लाख 68 हजार 88 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10 हजार 278 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 2 हजार 996 मुख्य केंद्र व 6 हजार 639 उपकेंद्र मिळून 9 हजार 635 ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शाखानिहाय विद्यार्थी संख्येचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. विज्ञान - 6 लाख 32 हजार 994, कला - 4 लाख 37 हजार 336, वाणिज्य - 3 लाख 64 हजार 362, किमान कौशल्यावर अधारित अभ्यासक्रम ( व्यावसायिक अभ्यासक्रम - 50 हजार 202, टेक्निकल सायन्स ( आयटीआय) 932.
मार्च एप्रिल 2022 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी ) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली असून सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरेलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एखही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दि. 3 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वा. पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे विलंब शुल्क न आकारता स्विकारण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने 12 वी परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून परीक्षेदरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरावे.
परीक्षेचे वेळापत्रक दि. 21 डिसेंबर 2022 रोजी मंडळआच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तसेच दि. 5 व 7 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांची परीक्षा तांत्रिक अपरिहार्य कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दिनांक 5 एप्रिल व 7 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हा निहाय प्रत्येकी एक किंवा दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंडळ व 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष स्थापन करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना गणित, पुस्तकपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षेसाठी गणकयंत्र वापरण्यास परवागनी देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी गणकयंत्र स्वतःचे आणावयाचे आहे. सदर गणकयंत्र फक्त गणकयंत्र स्वरुपाचाच असावा. मोबाईल अथवा इतर इलेक्ट्रॉनिक स्वरुपाचा वापरता येणार नाही. संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबद्ध व सर्व घटक समावेशक असा गैरमार्गाशी लढा या अभियानाचा कृती कार्यक्रम यावर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेऊन याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्र स्तर सभा, पालक सभा, विद्यार्थ्यांचे उद्भोदन इ. द्वारे या अभियानाचा कृती कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबवण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ठ वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
परीक्षाकाळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शसकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्रांच्या परीसराचे व्हीडिओ चित्रीकरण इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परीरक्षक ( रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्र व उपकेंद्रावर कार्यरत राहणार आहेत.
परीक्षेसाठी परीक्षार्थी, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, प्रकल्प व अंतर्गत मुल्यमापन इ. परीक्षा व लेखी परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र चालक,परीरक्षक व विभागीय मंडळांना परीक्षेसंदर्भात सूचना तयार करून पाठवल्या असून, केंद्र चालक, उपकेंद्र चालक व परीरक्षक यांच्या विभागीय मंडळस्तरावर बैठक आयोजित करण्यात आल्या.
मंडळाने निर्धारीत केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोना बाधीत झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि. 31 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. Out of turn चा कालावधी उपरोक्त कालावधीत समाविष्ट असेल त्यामुळे Out of turn साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.
कोविड - 19 च्या पार्श्वभूमीवर पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र, उपकेंद्र, 75 टक्के अभ्याक्रमावर अधारित लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. तोंडी परीक्षा व अंतर्गत तत्सम मुल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा देण्यात आली आहे. लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनीटे जादा वेळ, तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनीटे जादा वेळ देण्यात आली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिःस्थ परीक्षक संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून नियुक्त करण्यात आले आहेत. विविध परीक्षेसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांसाठी कोविड 19 संदर्भात सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्यांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे कळवण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान कोविड 19 च्या अनुषंगाने शासन व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी 25 प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकीटे देण्यात येणार आहेत.
प्रचलित पद्धतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून याविषयासाठी एकूण 1 लाख 47 हजार 775 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सदर विद्यार्थी 1 हजार 829 केंद्रावरून परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत. समान्य ज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन होत असून या विषयासाठी एकूण 1 हाजर 914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून 44 केंद्रावर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणार आहेत.
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनीटे आगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो सर्व संबंधितांना कळविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैर प्रकाराच्या प्रलोभनास बळी पडू नये. 12 वी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन व पालन करावे.
एन.एस.क्यू.एफ. व्यवसाय शिक्षण विषयक अभ्यासक्रमांतर्गत (NSQF) E-3,E-5, E-6 व F-6,F-8 तसेच G-1 ते G-6,G-8,G-9 या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास विभागीय मंडळांच्या हेल्पलाईन द्वारे मार्गदर्शन मिळवण्यासाठी कोकण विभागीय मंडळाचा हेल्पलाईन क्र. पुढीलप्रमाणे आहे. 02352-228480, 02352-231250. तसेच राज्यमंडळ स्तरावरील हेल्पलाईन क्र. 020-25705271, 020-25705272 असा आहे.
00000
Comments
Post a Comment