डीएपी खताला पर्यायी खते वापरा

सिंधुदुर्गनगरी दि १८(जिमाका) :- डीएपीला पर्यायी खते वापरल्यामुळे केवळ उत्पादन खर्च कमी नाही,तर जमिनीचे आरोग्य सुधारते आणि शाश्वत शेती पध्दतींना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे, शेतकऱ्यांनी उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करुन स्थानिक कृषी अधिकारी किंवा कृषी विद्यापीठांच्या तज्ञांचा सल्ला घेऊन खत व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, विशेषतः डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) च्या अनुपलब्धतेमुळे किंवा जास्त दरामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता अनेक किफायतशीर आणि पर्यायी खतांचे पर्याय उपलब्ध होत आहेत. कृषी तज्ज्ञांकडून आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून डीएपीला पर्याय म्हणून इतर खतांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन खर्चही कमी होतो. डीएपी (DAP) ला पर्याय का? डीएपी हे फॉस्फरस आणि नायट्रोजन युक्त एक महत्त्वाचे खत मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, अनुदानाचे प्रश्न आणि वितरण साखळीतील अडचणी यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना डीएपी मिळण्यास अडचणी येतात किंवा ते चढ्या भावाने खरेदी करावे लागते. यामुळे, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आणि नफा कमी होतो. उपलब्ध पर्यायः- सिंगल सुपर फॉस्फेट (SSP): डीएपीला एक उत्तम आणि स्वस्त पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) कडे पाहिले जाते. एसएसपीमध्ये फॉस्फरस (१६ टक्के), सल्फर (११ टक्के) आणि कॅल्शियम (२१ टक्के) हे महत्त्वाचे घटक असतात. सल्फरमुळे पिकांची वाढ चांगली होते आणि तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते. हे खत डीएपीच्या तुलनेत स्वस्त असून, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी याचा प्रभावीपणे वापर करत आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम (NPK) मिश्र खतेः बाजारात विविध प्रमाणातील NPK मिश्र खते उपलब्ध आहेत, जसे की 10:26:26, 19:19:19, 15:15:15, 16:16:16, 9:24:24 इत्यादी. गरजेनुसार आणि पिकाच्या अवस्थेनुसार या खतांचा वापर करता येतो. ही खते संतुलित पोषण देतात आणि डीएपीवरील अवलंबित्व कमी करतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, डिएपीच्या एका गोणीच्या ऐवजी अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी खत एकत्रित वापरणे ही एक चांगली पर्यायी पद्धत आहे. यामुळे नत्र आणि स्फुरद या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज भागते. शेतकऱ्यांसाठी सल्लाः- मात्ती परीक्षणः खतांचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीतील पोषक तत्वांची नेमकी स्थिती कळते आणि त्यानुसार योग्य खतांची निवड करता येते. संतुलित खत वापरः कोणत्याही एकाच खतावर अवलंबून न राहता, विविध खतांचा संतुलित वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पिकांचे आरोग्य चांगले राहते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'