फळपीक विम्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का) : राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला आहे. मृग आणि आंबिया बहारातील सन 2025-26 च्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक अंतर्गत हा युनिक क्रमांक असणे बंधनकारक राहील, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभाकरिता 15 एप्रिल 2025 पासून शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य केला आहे. या निर्णयामुळे आता फळपीक विमा योजनेतही पारदर्शकता आणि सुलभता येण्यास मदत होणार आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांची अचूक ओळख आणि त्यांच्या जमिनीची माहिती एकत्रित करणे सोपे होईल. या नवीन नियमामुळे आता जे शेतकरी सन २०२५-२६ च्या मृग आणि आंबिया बहारातील फळपीक विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना सर्वप्रथम आपला शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) काढून घेणे आवश्यक आहे. हा क्रमांक नसल्यास त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे कृषी विभागाने सर्व संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपला Farmer ID प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय केवळ फळपीक विमा योजनेपुरता मर्यादित नसून, कृषी विभागाच्या इतर योजनांसाठीही 'शेतकरी ओळखपत्र क्रमांक' अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी एकच ओळखपत्र पुरेसे ठरणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'