छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा 'पायाभरणी समारंभ' पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवजयंतीच्या दिवशी होणार समारंभ पुतळ्याची उंची ६० फूट ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता

सिंधुदुर्ग नगरी दिनांक 17 (जिमाका) मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग , सावंतवाडी अंतर्गत हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर असून काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे. पुतळ्याच्या ब्राँझ धातूच्या उभारणीच्या कामाचा 'पायाभरणी समारंभ' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर ,आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी सांगितले आहे. या पुतळा उभारण्याच्या कामास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ कोटी ७५ लाख रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुसार विभागाने या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे.राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीस कामाचे कार्यादेश दिनांक 11/ 10/ 2024 अन्वये निर्गमित केलेले आहेत. सदर पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर सुरू असून आजमितीस पुतळ्याचे 10 फूट उंचीचे आरसीसी चौथरा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत मालवण येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या तलवारधारी पुतळ्याची उंची 60 फूट इतकी असून संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात येत आहे. पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात येत आहे . तसेच चौथऱ्यासाठी M50 या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे .या पुतळ्याचे संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात येत असल्याचेही श्री किणी यांनी सांगितले आहे. **

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'