निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीव्दारे शेत नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी सन 2024-25 या वर्षामध्ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीव्दारे शेत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या मॅगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२४ -२५ मध्‍ये आज अखेर महाराष्ट्र राज्यातून ९ हजार ४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ होती. परंतु अपेडा नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि.२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात यावी. निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय/ शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करण्यात यावे. याबाबतच्या सूचना आयुक्तालयाच्या पत्राने देण्यात आल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र -१) अर्ज दाखल करावा. (कागदपत्रे- अर्ज, ७/१२, ८ अ आधार कार्ड) त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यामार्फत (कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी) क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र ४ अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र -क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे. सर्व आंबा बागायतदारांनी सन २०२४-२५ मध्‍ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मॅगोनेटव्‍दारे नोंदणीसाठी त्‍वरीत अर्ज करण्‍यात यावेत. प्रथम नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, ७/१२, ८अ, बागेचा नकाशा व आधार कार्ड इत्‍यादी कागदपत्राची आवश्‍यकता आहे. मॅगोनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची वाढीव व अंतिम मुदत दि. २८ फेब्रुवारी २०२५ अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करणे करीता संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्‍याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'