कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक भाविकांच्या सोयीसाठी १०० जादा बसचे नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे

•कायमस्वरुपी सुविधा उभारा •विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष सोयी- सुविधांची पाहणी करावी •भाविकांची तक्रार येता कामा नये सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून यात्रा कालावधीत १०० जादा बस उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मागच्या वर्षी ७४ बस सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी पालकमंत्री नितेश राणे यांनी १०० जादा बस सोडण्याचा निर्णयामुळे प्रवासाची चिंता मिटल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. देवगड, विजयदुर्ग, मालवण आणि कणकवली या आगारातून जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात देवगड तालुक्‍यातील कुणकेश्वर देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. पुढच्या वर्षी होणाऱ्या यात्रेपर्यंत कुणकेश्वर तसेच आंगणेवाडी परिसरात भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात सुविधा उपलब्ध करुन देण्यापेक्षा कायमस्वरूपी सोयी सुविधा कशा प्रकारे उभारता येतील यासाठी आत्ता पासून नियोजन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले. यात्राकालावधीत भाविकांची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी. संबंधित विभाग प्रमुखांनी यात्रेपूर्वी मंदिर परिसराला भेट देऊन सोयी सुविधांचा आढावा घ्यावा. पुरेशी आरोग्य पथकांची नेमणूक करावी, आपत्ती व्यवस्थापण प्रशिक्षण देण्यात यावे, एमएससीबीने सतर्क राहावे, मोबाईल नेटवर्क सक्षम करावे, तात्पुरत्या स्वरुपाच्या शौचालयाची व्यवस्था करावी, नियंत्रण कक्षाची उभारणी करावी असेही निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी उपस्थितांना दिले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'