माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सव स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेंद्र कांबळे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी केलेले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन 2024-25 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये गायन - शात्रीय संगीत एकल/समूह, पारंपारिक लोकसंगीत/ भक्तीगीत एकल किंवा समूह गायन, पारंपारिक लोकसंगीत /भक्तीगीत समूह, देशभक्ती समूह. वादन- शात्रीय स्वर वाद्य एकल / शात्रीय तालवाद्य एकल किंवा वाद्यवृंद शास्त्रीय/लोकसंगीत. नृत्य-शात्रीय नृत्य एकल किंवा प्रादेशिक लोकनृत्य समूह /आदिवासी नृत्य किंवा समकालीन नृत्यरचना समूह (गैर फिल्मी). नाट्य- एकपात्री अभिनय/नकला किंवा मूकाभिनय समूह, नाटक समूह . दृश्यकला- द्विमित चित्र, त्रिमित चित्र किंवा स्वदेशी खेळणी तयार करणे किंवा स्थानिक शिल्पकला एकल. पारंपारिक गोष्ट वाचन / कथावाचन (1 किंवा 2 विद्यार्थी) या 6 कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. सन 2024-25 मध्ये राज्याच्या 6 कला प्रकारांतून प्रत्येकी 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थीनी अशा 23 विद्यार्थ्यांचा संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑलाईन कला उत्सवासाठी अंदाजे 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धेचे प्रत्यक्ष स्वरूपात आयोजन दि. 26 सप्टेंबर 2024 या दिवशी करण्यात येणार आहे. कला उत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.9 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे अधिक माहितीसाठी व स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली माहिती https://forms.gle/c1ARN4cVjr73mgS6A या गुगल लिंकमध्ये दि.25सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत भरण्यात यावी. स्पर्धेचे ठिकाण :- न्यु इंग्लिश स्कूल, कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, स्पर्धेचे दिनांक व वेळ दि.26 सप्टेंबर 2024 वेळ सकाळी 10.30 वा.अधिक माहितीसाठी अधिव्याख्याता बी.एस. कांबळे, मो.नं. ९७३०२४८१४९ जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, यांच्याशी संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'